शेतकरी कामगार पक्ष काल आज आणि उद्या

शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास म्हणजे त्याग आणि संघर्षाचा इतिहास आहे. 1946 मध्ये काँग्रेस पक्षाने जनतेला वेळोवेळी दिलेल्या आश्‍वासनांना आणि निवडणूक जाहीरनाम्यातील वचनांना हरताळ फासला. काँग्रेस सरकार हे भांडवलदारांचे हित पाहणारा व शेतकरी कामगारांचे राज्य स्थापनेच्या घोषणेच्या विरोधात काम पाहत आहे हे लक्षात येताच शंकरराव मोरे यांनी याविरुद्ध पहिला आवाज उठवला त्यांनी ही खंत आपल्या सहकार्‍यांना बोलून दाखवली. शंकरराव मोरे यांच्या पुढाकाराने 3 ऑगस्ट 1947 रोजी आळंदी जिल्हा पुणे येथे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी या जडणघडणीत केशवराव जेधे, यशवंतराव मोहिते, तुळशीदास जाधव, भाऊसाहेब राऊत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पिताश्री आनंदराव चव्हाण असे मातब्बर नेते होते. 1952 साली पहिल्या निवडणुका पार पडल्यानंतर भाषावार प्रांत रचना झाली नव्हती. त्यावेळच्या शेकापला बॉम्बे विधानसभेत 16 जागा व हैद्राबाद विधानसभेत 10 जागा अशा एकूण 26 जागा मिळाल्या. 1957 च्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शेकाप समिती म्हणून पुढे आला. सर्व महाराष्ट्र ढवळून निघाला. आचार्य अत्रे यांसारखे मुत्सद्दी पत्रकारांनी सभांतून आणि वर्तमानपत्रातून जनक्षोभ निर्माण केला. काँग्रेस विरोधी वातावरण निर्माण झाले. 105 हुतात्म्यांचे बलिदान पक्षाने वाया जाऊ दिले नाही. 1957 च्या निवडणुकीत सर्वात जास्त 31 आमदार निवडून आले. त्यामध्ये भाई दि. बा. पाटील (पनवेल), नागनाथ नायकवडी (वाळवा), यशवंत मोहिते (दक्षिण कराड), विठ्ठलराव हांडे

Content Img Left

(नाशिक), केशवराव धोंगडे (कंधार), उद्धवराव पाटील (उस्मानाबाद) कृष्णराव धुळूप (कल्याण) असे दिग्गज नेते निवडून आले . शेतकर्‍यांच्या व कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारा पक्ष अशी शेकापक्षाची प्रतिमा झाली. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून साखर कारखाने, सुत गिरण्या, बँका, शाळा महाविद्यालये अशी आमिषे दाखवून एक एक आमदार फोडण्याचे तंत्र काँग्रेसने सुरु केले. काही काँग्रेसमय झाले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार! पवारांच्या मातोश्री पुणे जिल्हा लोकल बोर्डावर शेकाप च्या वतीने निवडून गेल्या. त्यांचे मोठे बंधू वसंतराव पवार हे शेकापचे बारामती मतदार संघाचे 1955 चे उमेदवार होते. त्यानंतर यशवंतराव मोहिते, आनंदराव चव्हाण, र. के. खाडिलकर, तुळशीदास जाधव अशी मातब्बर मंडळी काँग्रेसच्या गोटात सामील झाली. भाषणे खूप जन करतात प्रभावी बोलतात पण शब्दांची आतषबाजी म्हणजे भाषण नव्हे, शब्दांना कृतीची जोड नसेल तर ते शब्द बापुडे केवळ वारा असे पोकळ ठरतात, आणि वार्‍यावरती उडून जातात. राजकारणात जेव्हा माणसे उतरतात तेव्हा त्यांच्या नजरेसमोर खरे म्हणजे एकच ध्येय असते. पैसा, अपरंपार सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा! परंतु आपण पनवेलच्या मतदारसंघावर नजर टाकली तर दोन उत्तुंग नेते आपल्या मनचक्क्षु पुढे तेजाने झळकतात, त्यातील एक स्वर्गीय दि बा पाटील व दुसरे स्वर्गीय दत्तूशेठ म्हणजेच तात्या! 1957 पासून 1994 पर्यंत पनवेल-उरण मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्व केले. मशाली सारखे पेटत आणि चंदनासारखे झिजत राहिले. परंतु स्वतःसाठी, स्वतःच्या मुलांसाठी साधी एक वार जागा सिडको कडून घेतली नाही कि कुठल्या बिल्डरकडे भागीदारी मागितली नाही. निस्सीम त्याग आणि समर्पण म्हणजे काय हे या नेत्यांकडून शिकावे. हाच वारसा बाळाराम पाटील, आमदार विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाने पुढे नेत आहेत. एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे, 24 तास समाजसेवा, तीही निष्काम वृत्तीने! एखाद्या गोष्टीकडे माणसे वेगवेगळ्या दृष्टीने पाहतात, काही माणसे समोरचे दिसेल त्यावर मत बनवितात काही आजूबाजूचा वेध घेतात. 2000 सालची गोष्ट आहे मी त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. तात्यांचा 70 वा वाढदिवस! त्यांना 70 लाखांची थैली अर्पण करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला. पण तात्यांवर निस्सीम प्रेम करणार्‍या कार्यकर्त्यांनी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी जमविला. प्रा एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि शरद पवार यांच्या शुभहस्ते तात्यांना एक कोटी, एक लक्ष, एक हजार एकशे एक रुपयांची थैली अर्पण केली. पण एका क्षणाच्या आत तात्यांनी ती थैली कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीला देणगी म्हणून देऊन टाकली. कसला हि मोह नाही कि कसलाही हव्यास नाही. उद्याच्या भविष्याची चिंता नाही. लोकांनी दिलेले प्रेम त्यांच्या त्यागातून आणि समर्पणातून ओथंबून वाहत आहे. जे पेरावे ते उगवते असे म्हणतात, तात्यांनी जे पेरले ते बाळाराम पाटील यांच्या रूपाने उगवले. हा अनुभव लोकांनी वेळोवेळी घेतला आहे. पनवेल पंचायत समिती सभापती ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. या प्रवासात लोकप्रतिनिधीना मिळणारे अधिकार, कक्षा, तिथले नियम, त्यातील मर्यादा व पळवाटा आणि या सर्वांवर मात करून आपल्याला अभिप्रेत असलेले काम कसे करून घ्यायचे याचा तपशीलवार अभ्यास त्यांनी केला. या व्यासंगामुळे तालुक्यातील, जिल्ह्यातील समस्यांचा सखोल विचार केला. फक्त विचार करून थांबले नाहीत तर तो कृतीत आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला. या ठिकाणी एकाच उदाहरण सांगतो, रायगड किल्यावर वीज कोसळली, कुणीतरी बाळाराम पाटील यांना फोन करून सांगितले कि वीज पडून शिवरायांच्या समाधीचे नुकसान झाले आहे. ही घटना रात्री 11 वाजता घडली. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता, बाळाराम पाटील या बातमीने अस्वस्थ झाले. त्या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे सी ओ पानिपतकार विश्‍वास पाटील होते. त्यांना हि शिवरायांबद्दल विलक्षण आदर! दोघेही क्षणाचाही विलंब न करता रायगडावर रवाना झाले. भर पावसात रात्री अडीच वाजता रायगडावर पोहोचले भग्न झालेल्या समाधीची पाहणी केली आणि त्वरित जिल्हा परिषदेकडून 10 लाख रुपये खर्चून शिवरायांची समाधी पुर्वावस्थेत आणली. ज्याची अस्वस्थता उत्तुंग ध्यासातून निर्माण झालेली असते त्याला कधीही उदास व्हावे लागत नाही. बाळाराम पाटील यांनी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला कि तो पूर्णत्वासनेल्या शिवाय रहात नाही. खारघर, नव्या मुंबईतील एक अग्रगण्य उप नगर! येथे मध्यम व उच्चभ्रू नागरिकांची लोकवस्ती आहे. अनेक देशी विदेशी शैक्षणिक संस्थांचे जाळे या भागात पसरले आहे. अनेक अत्याधुनिक मॉल्स संस्कृती येथे रुजू पाहत आहे. येथील महिलांनी एकमुखी मागणी केली की खारघर ‘नो लिकर झोन’ व्हायलाच हवा. बाळाराम पाटील यांनी आमदार विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको प्रशासन, पोलिस खाते, कलेक्टर व संबंधित अधिकारी यांना भेटून ‘नो लिकर झोन’ मंजूर केला. काही दिवसात शेकाप च्या सरपंचानी एका हॉटेल मालकास दारू विक्रीसाठी एनओसी दिली. बाळाराम पाटील यांनी त्याविरुद्ध दंड थोपटले. सरपंच पक्ष सोडून गेला तरी चालेल. पण माझ्या माता भगिनींचे संसार उध्वस्त झालेले मी पाहणार नाही. या भूमिकेवर ते ठाम राहिले, निष्काम कर्मयोगी म्हणजे काय असते ते बाळाराम पाटील यांच्याकडून शिकावे असे मला वाटते. पनवेल शहरांत आंबेडकर भवन उभे राहिले त्याचा इतिहास आज जिवंत अन् ज्वलंत आहे. नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे असताना आंबेडकर भवनाचा ठराव क्र. 20, दि 9/01/2004 रोजी मंजूर करण्यात आला. या भूखंडावर राहणार्‍या 18 झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसनाचा प्रश्‍न निर्माण झाला. आमदार विवेक पाटील यांनी स्वतः चे 35 लाख खर्चून त्यांना पक्की घरे बांधून दिली त्यासाठी आमदार निधी वापरला नाही. सामाजिक बांधिलकी म्हणजे काय असते ते आमदार विवेक पाटील यांनी या कृतीतून दाखवून दिले. शेकाप चे धेय्य आहे कि जे लोक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बाबतीत उपेक्षित, वंचित आणि शोषित असतील त्यांचे जीवनमान उंचावण्याचा, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघर्ष करण्याचा आहे. पण शेकाप फक्त संघर्ष करणारा पक्ष आहे अशी जनमानसात प्रतिमा तयार झाली आहे. त्याला डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी छेद दिला पाहिजे, हा पक्ष सामाजिक ऐक्याची, बंधुत्वाची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात प्रज्वलित करून गरीब, दुःखी, शोषित, पिडीत, सागरपुत्र आणि वनवासी यांचे अश्रू पुसण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहे. अशा प्रकारे तात्त्विक ध्येय-धोरणे, घटना आणि यशस्वी लढ्यांचा चढता आलेख असलेला हा पक्ष बदलत्या राजकीय समीकरणात मार्केटिंगचे तंत्र न स्वीकारल्याने प्रसार माध्यमांपासून दूर राहिला. सत्तेसाठी कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत. तत्वांना तिलांजली दिली नाही, त्यामुळे दुर्दैवाने आजचा तरुण माझे माझ्या घराचे पक्षाशी काय नाते आहे हे विसरत चालला आहे. स्वार्थी आणि मतलबी लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी इतर पक्ष दावणीला बांधले. शेकाप साठी सुवर्ण पहाट उगवली आहे ती खटारा या निशानीने. 1946 पासून खटारा या निशानीनेच पक्षाला वैभवाचे दिवस दाखविले. कष्टकर्‍यांचा व शेतकर्‍यांच्या दैनंदिन जीवनात खटारा साथ-संगत करीत राहिला. म्हणूनच 1952 पासून 50 वर्षे विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद शेकापकडे राहिले. आज खटारा त्याचं दिमाखात गतवैभवाची कहाणी सांगत आहे. महाराष्ट्राला आता गतिमान करायचे असेल, भ्रष्ट्राचारमुक्त करायचे असेल, महागाई मध्ये होरपळलेल्या जनतेला चार घास सुखाचे खायचे असतील तर शेकाप शिवाय पर्याय नाही.!!!